समाज परिचय

समाज परिचय

१ मे, १९६० साली गुजरातला राज्या चा दर्जा प्राप्त झाला. गुजरातला नवीन राजधानी देण्यासाठी गांधीनगर शहरची योजना बनविण्यात आली. ०२, ऑगस्ट १९६५ रोजी गांधीनगर शहराच्या रचनेची पायाभरणी करण्यात आली. १९६९ साली इथे फक्त दोन- तीन सरकारी कार्यालये होती. यातील कर्मचारी त्यांना मिळालेल्या सरकारी निवासात वास्तव्य करत होते.त्यात काही मराठी भाषिक परिवार पण होते.  त्यांनी एकत्र येवून १९७० साली “श्री सार्वजनिक गणेशोत्सव समिती, गांधीनगर” या नावाने गणेश स्थापनेची सुरुवात केली. हळूहळू शहरा मध्ये मराठी भाषिकांची संख्या वाढू लागली. १९७७ साली असा विचार करण्यात आला की आपली एक मराठी संस्था असावी; जी मराठी संस्कृती, भाषा, सण, चालीरीतीचा आपल्याला परिचय करुन देत राहील. यातूनच ११ ऑक्टोबर १९७८ साली “महाराष्ट्र समाज गांधीनगर” ची स्थापना झाली. महाराष्ट्र समाजाचे विविध उपक्रम करण्यासाठी एखादी कायमस्वरूपी वास्तू असावी या कल्पनेतून समाज भवनाची वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. समाजभवनाच्या वास्तूचे स्वप्न १९९४ साली साकार झाले. महाराष्ट्र समाज गांधीनगर ही एक सांस्कृतिक, सामाजिक व  स्वयंसेवी संस्था आहे. ही संस्था गांधीनगर शहर व परिसरातील मराठी भाषिक लोकांचे प्रतिनिधित्व करते. आज या संस्थेचे सुमारे ८५० सभासद आहेत. महाराष्ट्र समाज गांधीनगर हे बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली (मध्यवर्ती संघटना) यांच्याशी संलग्न संस्था आहे. स्थापनेनंतर समाजाच्या दशकपूर्ती वर्षात १९८९ व १९९७ साली बृहन्महाराष्ट्र मंडळाचे वार्षिक अधिवेशन गांधीनगरला आयोजित करण्याचा सन्मान महाराष्ट्र समाज गांधीनगरला मिळाला होता. बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली द्वारा प्रायोजित १७ वी अखिल भारतीय नवोदित शास्त्रीय गायन संगीत स्पर्धा आयोजनाचा मान  महाराष्ट्र समाज गांधीनगरला २००९ साली मिळाला.

गौरव :- बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीच्या २०११ च्या शिर्डी येथील वार्षिक अधिवेशनांत  संस्थेने सामाजिक क्षेत्रात केलेल्या विशेष  कामगिरी बद्दल स्व.प्रभाकर राव पांडे स्मरणार्थ ” उत्कृष्ट -संस्था सन्मान” देण्यांत आला.