मंदिर माहिती

श्री सिध्द्धिविनायक मंदिराची माहिती

बरेच वर्षाचे स्वप्न असेलेले आपले आराध्य दैवत श्री. गणरायाचे गांधीनगर येथील पहिलेच असे श्री सिध्द्धिविनायक मंदिराचा प्राण-प्रतिष्ठा महोत्सव दिनांक ०५, ०६ व ०७ फेब्रुवारी २०१८ रोजी (त्रिदिन साध्य) मूर्तिमंत झाला. श्री सिध्द्धिविनायकची सुंदर व आकर्षक संगमरवरी मूर्ती खास जयपुर येथे बनवून घेण्यात आली. गांधीनगरचे गणेशभक्त श्री गजानन वामन भावे व श्री उदय शंकर नाफडे यांच्या सौजन्याने ही मूर्ती प्राप्त झाली. प्रतिस्थापणेच्या दिवशी महाप्रसादासाठी पूर्ण गांधीनगरवासीयांना निमंत्रण देण्यात आले होते व अंदाजे तीन हजार भक्तांनी याचा लाभ घेतला.

श्री सिध्द्धिविनायकाच्या सिंहासनाच्या पृष्ठ भागावर अष्टविनायक विराजमान आहेत. चांदीच्या छत्रामुळे मूर्तीस वेगळेच सौन्दर्य लाभत आहे. मूर्तीच्या बरोबर समोरच्या दिशेस श्री मूषकराज विराजमान आहेत. त्यांना आपले मनोगत सांगितल्यास ते अवश्य पूर्ण होते अशी या मंदिराची प्रतिष्ठा झाली आहे. मंदिराच्या द्वारास सुंदर नक्षीकामाने सजविण्यात आले आहे.

मंदिराच्या आवारातील वातावरण एकदम प्रसन्न, आल्हाददायक व भक्तिमय असते. ज्या मुळे थोडावेळ मंदिरात बसल्याने मन:शांति लाभते. गांधीनगर मधील एकमेव श्री गणपती मंदिर असल्याने गांधीनगर शहर व आसपासच्या परिसरातील अनेक भक्तगण मंदिराची भेट घेत असतात. विशेषत: संकष्टी चतुर्थीला दर्शना साठी भक्तांचा पूरच लोटतो.